महाविकासआघाडीत जाण्याबद्दल निर्णय घेतलेला नाही – बच्चू कडू
शरद पवार - बच्चू कडू यांची दिल्लीत भेट

गेल्या काही दिवसांपासून राज्याच्या राजकारणात विविध घडामोडी घडत आहेत. त्यातच आज सकाळी प्रहार संघटनेचे प्रमुख बच्चू कडू यांनी राष्ट्रवादी पवार गटाचे नेते शरद पवार यांची भेट घेतली. शनिवारी (१० ऑगस्ट) सकाळी ८ च्या दरम्यान मोदीबागेत शरद पवार आणि बच्चू कडू यांची भेट झाली. या भेटीत बच्चू कडू यांनी महाविकासआघाडीमध्ये सहभागी होण्याबद्दल मोठे वक्तव्य केले. यामुळे आता चर्चांना उधाण आले आहे.
“बच्चू कडू शिवसेनेत फूट पडल्यानंतर एकनाथ शिंदेंसोबत गेले होते. गेल्या अनेक दिवसांपासून बच्चू कडू आणि महायुती यांच्यात धुसफूस चालू आहे. त्यातच आज त्यांनी शरद पवारांची भेट घेतल्याने सर्वांच्याच भुवया उंचावल्या. शरद पवारांची भेट घेतल्यानंतर बच्चू कडू यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी आम्ही सरकारला 1 सप्टेंबरपर्यंतचा वेळ दिला आहे. त्यानंतर आम्ही पुढील निर्णय घेऊ”, असे वक्तव्य केले.
शरद पवारांशी ‘या’ मुद्द्यांवर चर्चा
माझी आणि शरद पवारांची भेट आधीच ठरली होती. मी काल ज्या मुद्द्यांवर आंदोलन केलं, त्याच मुद्द्यांवर चर्चा करण्यासाठी शरद पवारांची भेट घेतली. ज्याप्रमाणे जाती, धर्मांवर राजकारण होतं, त्याच प्रमाणे शेतकरी, शेतमजूर दिव्यांग आणि जे कोणी अडचणीत असणारी लोकं आहेत, त्यांच्यावर राजकारण व्हायला पाहिजे. ते मुद्दे चर्चेत यायला हवेत. यावरच शरद पवारांशी चर्चा झाली, असे बच्चू कडू यांनी सांगितले.
“माझ्या नाराजीवर काहीही अवलंबून नाही”
यापुढे बच्चू कडू यांनी महायुतीतील नाराजीबद्दलही वक्तव्य केले. “माझ्या नाराजीवर काहीही अवलंबून नाही. माझ्यासाठी शेतकऱ्याचे प्रश्न महत्त्वाचे आहेत. बच्चू कडू स्वत:साठी कधीही नाराज होत नाही. ते कधीही नाराज असणार नाहीत. शेतकरी, शेतमजूर, दिव्यांग ज्यांनी आमच्यावर अफाट प्रेम केलं, त्यांच्या नाराजीचा सूर आम्ही सरकारसमोर ठेवत असतो. तोच आमचा विषय आहे. आम्ही त्यांना बैठक, चर्चा हे करण्यासाठी १ सप्टेंबरपर्यंतचा वेळ दिला आहे. या बैठकीदरम्यान सरकार काय निर्णय घेतं, कोणत्या मुद्द्यांवर लक्ष केंद्रीत करतं, यासाठी सरकारला हा वेळ दिला आहे.
शेतकरी, कर्जमाफी, शेतमजूरांचे काही प्रश्न आहेत, याबद्दल शरद पवारांशी चर्चा केली. मी अजून महाविकासआघाडीत जाण्याबद्दल निर्णय घेतलेला नाही. मी १ सप्टेंबरपर्यंत काहीही करणार नाही. सरकारला त्यांच्या वेळ दिलेला आहे. मुद्द्यासाठी काहीही करु. शेतकरी, शेतमजूर, दिव्यांगांसाठी काहीही करु”, असे सूचक विधान बच्चू कडू यांनी केले. त्यामुळे आता येत्या काळात बच्चू कडू महाविकासाआघाडीत सहभागी होणार का? हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे.



