मराठवाड़ामहाराष्ट्रमुख्य बातमी

वाळूज येथील हँडग्लोज कंपनीला भीषण आग; सहा कामगारांचा होरपळून मृत्यू

छत्रपती संभाजीनगर (प्रतिनिधी) – छत्रपती संभाजीनगर शहराजवळील वाळूज औद्योगिक वसाहतीत हातमोजे आणि रबरशी संबंधित साहित्य तयार करणार्‍या सनशाइन या कंपनीला मध्यरात्री लागलेल्या आगीत सहा कामगारांचा होरपळून मृत्यू झाला. तर आठ कामगारांना वाचवण्यात यश आले असून त्यातील तीन ते चार जणांची प्रकृती गंभीर आहे. त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, छत्रपती संभाजीनगर येथील वाळूज एमआयडीसी या ठिकाणी सनशाईन एंटरप्राईज सी 216 ही हँडग्लव्ह बनवाणारी कंपनी असून या कंपनीत अंदाजे 20 ते 25 कामगार काम करतात. यांतील 10 कामगार हे याच कंपनीमध्ये राहत होते. आज मध्यरात्रीच्या सुमारास सगळे झोपेत असताना अचानक या कंपनीला आग लागली. यातील काही झोपलेल्या कामगारांना गरम वाफ लागल्याने त्यांना जाग आली, तेव्हा त्यांना आग लागल्याचे दिसले. यानंतर जीव वाचण्यासाठी कामगारांची पळापळ सुरू झाली. पण दुर्दैवाने कंपनीच्या मुख्य दरवाजाच्या इथेच ही आग लागल्याने कामगारांना या आगीतून लवकर बाहेर पडता आले नाही. मात्र, चार कामगारांनी पत्र्यावरून एका झाडाच्या साहाय्याने सुखरुप बाहेर पडण्यात यश मिळवले. पण दुर्दैवाने भल्ला शेख, कौसर शेख, इक्बाल शेख, मगरुफ शेख आणि अन्य दोन अशा सहा कामगारांना या आगीत आपला जीव गमवावा लागला.

मृत कामगारांच्या नातेवाईकांना मदत जाहीर

छत्रपती संभाजीनगरच्या वाळूज औद्योगिक वसाहतीत एका हँडग्लोज बनवणार्‍या कंपनीस लागलेल्या भीषण आगीच्या दुर्घटनेवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी तीव्र शोक व्यक्त केला आहे. मध्यरात्री लागलेल्या या आगीत सहा कामगारांचा जळून मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती आहे. या कामगारांच्या नातेवाईकांना मुख्यमंत्री सहायता निधीतून प्रत्येकी 5 लाख रुपये देण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत. याशिवाय जखमी कामगारांना तातडीने शासकीय खर्चाने सर्व वैद्यकीय उपचार द्यावेत अशाही सूचना त्यांनी प्रशासनाला दिल्या आहेत. आग शमविण्यासाठी तसेच अडकलेल्यांना सुखरूप काढण्यासाठी करण्यात आलेल्या बचाव कार्याची माहितीही त्यांनी घेतली व हे मदत कार्य व्यवस्थित पार पडण्यास सांगितले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button