
फांद्या फुलांनी व्यापलेल्या झाडाखाली केव्हापासून बसलीय ती. पक्ष्यांचा किलबिलाट दुपारचा एकांत ढवळत होता. अधून मधून गार वाऱ्याची झुळूक अंगाला स्पर्शून जायची . तिने मान वर केली. गर्द फांद्यामधून आभाळाचं दर्शन मोहक वाटत होतं. वर गेलेली मान सरळ करत तिने सभोवताली नजर फिरवली, आणि तिचं मन व्यापून गेलं आभाळ भरल्या आठवांनी.
ती निसर्गचक्राचाच एक भाग, एक सहज अविष्कार. वेलीवर एखादं फुल जितक्या सहजतेने उमलावं , इतकं सहज. सूर्याच्या कोवळ्या किरणांनी मातीला अलगद अच्छादावं इतकं एकजीव. ती अगदी त्याच्यासारखीच. सुसाट वाहणारा वारा भेदाभेद न करता कशालाही स्पर्श करतो तशीच. दादा सारखीच तीही. मातीत खेळणारी, दुडुदुडु धावणारी, चुलबुली, बोलकी बाहुली. बाळ रंगाचे कवडसे तिच्यातही तसेच दाटलेले , मोठ्या कुतूहलाचे, तिच्या मनातले काही प्रश्न अजूनही अनुत्तरीतच…खेळतानाही एक पाऊल पुढेच असायची ती त्याच्यापेक्षा. दादाच खेळगडी असायचा तिचा. त्याच्यापेक्षा हिची सरशी. पण कधी धाकधपटशा दाखवून तो हिला गप्प बसवायचा. तर कधी रडी खाऊन स्वतः जिंकायचा. तर कधी तो ऐकत नाही म्हणून बाकीचे हिलाच गप्प बसवायचे. माघार घेण्यातही हीचीच जडणघडण. तिथंही तिचं मोठेपण, आईकडून वारसांना मिळालेलं. जणू पिढ्यानपिढ्या तिच्या रक्तात भिनलेलं.घुंगुरवाळं लेणं लेऊन किती बागडली असेल घरभर, ओसरीत, आणि फाटकाच्या आत अंगणात सुद्धा. लाडावलेली ती आताशी उमलणाऱ्या फुलासारखी, थरथरणाऱ्या पाकळी सारखी . वाऱ्यावर हिंदोळतानाही तोल सावरणारी . सर्वांच्या पापणीच्या धाकात तिचं अवघं विश्वच बंदिस्त. काहीच कळायचं नाही तिला.ती आताशी पंख फुटलेल्या पाखरासारखी, कल्पनेच्या भराऱ्यांनी भरारलेली. झेपावली तर अवघं आभाळ पुरायचं नाही तरंगायला. पण…. तिथंच तर आहे ना सगळं? उमलते आहेस तर अंगणातल्या बागेपूर्ती तुझी मर्यादा. कितीही वादळे आली तरी मातीत पाय घट्ट रोवायचे अंगणातल्या. फुटलेले पंख ही कधीच छाटलेले नियमांच्या धारदार शस्त्रांनी. जखमांनी चिघळलेलं मनही मोठ्या धैर्याने जपत ती वावरत असते, काहीच न घडल्याच्या अविर्भावात. आईचा मायेचा हात जेव्हा डोक्यावरून फिरायचा, तो स्पर्शच तिला शिकवून जायचा बरंच काही. जाणवायच्या तिला आखून दिलेल्या कक्षा, तिला घालून दिलेल्या मर्यादा. तिला जाणवतंय आताशा तिच्यातलं आणि आईतलं सारखेपण.
खरंच… असे असेल काहो? की तिच्या जन्माने कुणाच्याच डोळ्याचे पारणे फिटले नाहीत…. तिचं हे भळभळतंपण पाहून दगड धोंड्यांनाही पाझंर फुटला असता, गहिवरून आलं असतं, पण ह्यांना….?न केलेल्या चुकांचे हिशोब द्यावे लागले तिला आयुष्यभर ! सारी वादळं आतल्याआत शमविली तिने. मोठमोठे आग डोंब पचविले….. गल्लीपासून…. दिल्लीपर्यंत…तिच्या वेदनांचा बांध कधी फुटू दिलाच नाही. तिलाही माहित होतं जणू त्याचं अमर्याद पण…ती हवी नसतानाही जन्माला आलेली! तरीही साऱ्या जगाचा सांभाळ करणारी. विचारांच्या घट्ट दोरीने विश्वाला जोजवणारी. क्षमतेच्या परिस पंखात आभाळ सामावून घेणारी. मनाच्या चैतन्याने पृथ्वीवर सुखाचे सोहळे संपन्न करणारी. तिला आता वेध लागले आहेत.
-सौ.नंदिनी पाटील



