
पल्लेकेले : तीन सामन्यांच्या टी-२० मालिकेतील पहिल्या सामन्यात भारताने श्रीलंकेचा ४३ धावांनी पराभव केला. प्रथम फलंदाजी करताना भारताने २० षटकांत ७ गडी गमावून २१३ धावा केल्या. प्रत्युत्तरात श्रीलंकेचा संघ १९.२ षटकांत १७० धावांवर गारद झाला. त्यामुळे सूर्याच्या नेतृत्वाखाली पहिल्याच सामन्यात टीम इंडियाने शानदार विजय मिळविला.
एकवेळ श्रीलंकेची धावसंख्या एका विकेटवर १४० धावा अशी होती. मात्र, यानंतर श्रीलंकेच्या संघाने ३० धावांत पुढील ९ विकेट गमावल्या. श्रीलंकेकडून पथुम निसांकाने सर्वाधिक ७९ धावा केल्या. त्याचवेळी भारताकडून रियान परागने सर्वाधिक ३ विकेट घेतल्या. त्याने २० व्या षटकात लागोपाठ २ चेंडूत २ बळी घेतले. श्रीलंकेने नाणेफेक जिंकत गोलंदाजीचा निर्णय घेतला. पण भारताने श्रीलंकेसमोर २१४ धावांचे लक्ष्य ठेवले. कर्णधार सूर्यकुमार यादवने सर्वाधिक ५८ धावा केल्या तर ऋषभ पंतने ४९ आणि यशस्वी जैस्वालने ४० धावांची खेळी केली. श्रीलंकेकडून मथिशा पाथिरानाने चार विकेट घेतल्या.
प्रत्युत्तरादाखल श्रीलंकेचा संघ मैदानात उतरला तेव्हा एकवेळ संघ चांगल्या स्थितीत होता. मात्र त्यानंतर टीम इंडियाच्या गोलंदाजांनी जोरदार पुनरागमन केले. श्रीलंकेचे सलामीवीर कुसल मेंडिस आणि पथुम निशांक यांनी पहिल्या विकेटसाठी ८.३ षटकांत ८४ धावा केल्या. श्रीलंकेची धावसंख्या १४.१ षटकात १ गडी बाद १४० होती, पण त्यानंतर यजमान श्रीलंकेची फलंदाजी गडगडली. त्यामुळे श्रीलंकेचा ४३ धावांनी पराभव झाला.



