क्राईम

शोरूमच्या भिंतीला भगदाड पाडले; 15 लाखांचे मोबाईल पळवले

ठाणे : मोबाईलसह इलेक्ट्रानिक  साहित्य विक्री करणाऱ्या शोरूमच्या भिंतीला भगदाड पाडून शोरूम मधील जवळपास 15 लाखाचे मोबाईल लंपास केल्याची घटना समोर आली आहे. तक्रारदार अमोल ताराचंद परदेशी (वय 34) यांचे कल्याण – भिवंडी मार्गावर  असलेल्या कोनगावातील साई रेसिडेन्सी इमारतीमध्ये यश कलेक्शन नावाचे विविध कंपनीचे मोबाईलसह इलेक्ट्रानिक साहित्य विक्रीचे शोरूम आहे. त्यातच शोरूम मालक नेहमी प्रमाणे 27 जुलै रोजी रात्रीच्या सुमारास शोरूम बंद करून गेले होते. त्यानंतर 28 जुलै रोजीच्या पहाटेच्या सुमारास चार ते पाच चोरटयांनी शोरूमच्या लगतच पत्र्याचे कंपाऊंड असल्याने त्याचा आडोसा घेत, शोरूमच्या भिंतीला भगदाड पाडून आत प्रवेश केला. विशेष म्हणजे कल्याण – भिवंडी मार्गावर 24 तास रहदारी असताना चोरटयांनी शोरूम मधून जवळपास 15 लाखांच्या जवळपास विविध कंपनीचे महागडे मोबाईल लंपास केले.

दरम्यान, शोरूम मालक परदेशी हे नेहमी प्रमाणे 28 जुलै रोजी शोरूम उघडण्यासाठी सकाळच्या सुमारास आले असता हा चोरीचा प्रकार उघडकीस आला. त्यांनी तातडीनं कोनगाव पोलीस ठाण्यात चोरीच्या घटनेची माहिती दिली. त्यानंतर पोलीस पथक घटनास्थळी दाखल होऊन पंचनामा करत अमोल परदेशी यांच्या तक्रारीवरून भारतीय न्याय संहिता कलम 305, 331 (3), 331 (4) प्रमाणे गुन्हा दाखल करून सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे चोरट्याचा शोध सुरू केला.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button