
अनैतिक प्रेमसंबंधातून एका शिक्षिकेनेच प्रियकराची हत्या केल्याची माहिती समोर आली आहे. विद्यार्थ्यांना चांगले वागणुकीचे धडे देणारीच शिक्षिकाच या घटनेत मास्टरमाईंड असल्याचं पोलिसांच्या प्राथमिक तपासातून समोर आलं आहे. प्रियकराच्या हत्येसाठी आपल्या विद्यार्थ्यांनाच महिला शिक्षिकाने दोन लाख रुपयांची सुपारी दिली होती, नाशिक पंचवटी पोलिसांनी अवघ्या ५ तासात या घटनेचा छडा लावून आरोपी शिक्षिकेला अटक केली आहे. मयत युवक हा सेवानिवृत्त पोलिसांचा मुलगा आहे.
शहरातील पंचवटी परिसरात एका २५ वर्षीय तरुणाची डोक्यात धारदार शस्त्राने वार करून हत्या करण्यात आल्याची घटना काल सकाळी उघडकीस आली होती. यासंदर्भात नाशिकच्या पंचवटी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. तपासादरम्यान निवृत्त पोलीस अधिकाऱ्याच्या मुलाची हत्या करण्यात आली असून हत्या झालेल्या तरुणाचं नाव गगन कोकाटे असं आहे. गगन हा राहणार मसरूळ परिसरातील होता, त्याच्या शेजारीच राहणाऱ्या आरोपी भावना कदम या शिक्षकेशी ओळख झाली आणि दोघांच्या ओळखीचे रूपांतर प्रेमात झाले. मात्र, या प्रेमप्रकरणात गगन हा वारंवार भावना यांना भेटण्यासाठी त्रास देत असायचा, त्याचा राग मनात धरून भावना कदम हिने गगनचा काटा काढण्यासाठी आपल्याच विद्यार्थ्यांच्या मित्रांना दोन लाख रुपयांची सुपारी दिल्याची माहिती तपासातून समोर आली आहे.
पोलिसांनी संकेत रणदिवे (वय २०), मेहफुज सय्यद (वय १८), रितेश सपकाळे (वय २०) तिघेही रा. अशोकनगर तसेच गौतम दुसाने (वय १८, रा. गंगापूर रोड) यांना ताब्यात घेतलं आहे. त्यांची सखोल चौकशी केली असता गगन याच्या हत्येसाठी भावना कदम (रा. म्हसरूळ) हिने दोन लाख रुपयांची सुपारी दिली असल्याची माहिती मिळाली. पोलिसांनी भावना हिलाही ताब्यात घेतले.

