मराठवाड़ा

विजेचा धक्का लागल्याने तरुण शेतकर्‍याचा मृत्यू

पैठण प्रतिनिधी: शेतामधील कृषी पंप विद्युत मोटार सुरू करण्यासाठी गेलेल्या तरुण शेतकर्‍याचा विजेचा जोरदार धक्का लागल्याने जागीच मृत्यू झाल्याची घटना शुक्रवार दिनांक 5 जानेवारी रोजी घडली.
सुदर्शन(पप्पू) गोरख निवारे वय वर्ष 33 राहणार वाघाडी असे मयत झालेल्या तरुण शेतकर्‍याचे नाव आहे.
मयत सुदर्शन निवारे हा शेतीचा कृषी पंप सुरू करण्यासाठी वडवाळी येथील गोदावरी नदीमध्ये दुपारी साडेतीनच्या सुमारास गेला होता.
विद्युत मोटार सुरू केल्यानंतर सुदर्शन चा अचानक तोल गेला आणि उघड्या वायरला स्पर्श झाला. शरीरात वीज प्रवाह उतरल्याने सुदर्शनचा जागीच मृत्यू झाला.
विशेष म्हणजे सुदर्शन याला करंट बसला त्यावेळी त्याचे तीन शेतकरी मित्र त्याच्या सोबत होते. चिखल, गवत आणि अनेक वायरी उघडे असल्याने अवघ्या दोन मिनिटात या तरुण शेतकर्‍याचा जागेवरच मृत्यू झाला.
विजेचा धक्का लागताच त्याच्यासोबत असलेल्या मित्रांनी त्याला ताबडतोब उपचारासाठी पैठण शासकीय दवाखान्यात दाखल केले.
परंतु डॉक्टरने तपासून मृत घोषित केले. वडवाळीच्या याच गोदावरी नदीतून वडवाळी, वाघाडी ,आनंदपुर ,नाथ फॉर्म, मायगाव, नायगाव, पंथेवाडी या गावच्या शेत शिवारापर्यंत विद्युत मोटारी कृषी पंपाच्या पाईपलाईन जोडण्यात आलेल्या आहेत.
वडवाळीच्या गोदावरी नदीमध्ये विद्युत पंपाच्या अनेक वीज वाहक वायरी उघड्या अवस्थेत असल्याने या तरुण शेतकर्‍याला आपला जीव गमवावा लागला.
सुदर्शनच्या पश्चात एक पत्नी व दोन लहान मुली असा परिवार आहे. या घटनेमुळे वाघाडी वडवाळी गावासह परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button