जायकवाडीची पाणी पातळी 19.67 टक्क्यांवर
नाशिक, अहमदनगर जिल्ह्यातील पावसाचा फायदा
छत्रपती संभाजीनगर, प्रतिनिधी : जायकवाडी पैठण जलाशयातील पाणी पातळी आज, दिनांक ६ ऑगस्टला सकाळपर्यंत सध्या 19.67 टक्के होती. जी पायाभूत पातळीपेक्षा खूपच कमी आहे. जलाशयातील पाण्याची एकूण पातळी 1502.50 फूट आहे.
वरच्या भागात म्हणजे नाशिक आणि अहमदनगर जिल्ह्यात जोरदार पाऊस झाल्याने जलाशयात 58,535 क्युसेस पाण्याची आवक होत आहे, ज्यामुळे जलाशयातील पाणी पातळीत वाढ होण्याची अपेक्षा आहे. मात्र, यंदा ऑगस्ट महिन्याचा दुसरा आठवडा संपत आला तरीही मराठवाड्यात समाधानकारक पाऊस नाही. त्यामुळे शेती, पिण्याचे पाणी आणि औद्योगिक वापरासाठी पाणी पुरवठा करण्यासाठी पाण्याचे योग्य व्यवस्थापन करणे आवश्यक आहे. दरम्यान, नाशिक आणि नगर जिल्ह्यात पाऊस होत असल्याने त्याचा फायदा जायकवाडी धरणाला होत आहे. परंतु मराठड्यात पावसाची प्रतीक्षा कायम आहे.
मराठवाड्यातील शेती औद्योगिक वसाहत शहर ग्रामीण भागातील नागरिकांची तहान भागवणारा जायकवाडी धरणात अहमदनगर, नाशिक भागातील धरणातून गोदावरी नदी मार्गाने पाणी दाखल झाल्याने आज सकाळपर्यंत जायकवाडीचा साठा १९.६७ टक्क्यांवर पोहोचला आहे. हाच साठ काल दुपारी दोन वाजेपर्यंत १४.८९ टक्के होता. ही बाब दिलासादायक आहे.
नागमठाण गोदावरी नदी मार्गाने जायकवाडी जलाशयाकडे जवळपास ५१००० हजार क्युसेकने पाणी झेपावल्याने पैठण तालुक्यातील लोहगाव परिसरातील जायकवाडी धरण जलफुगवटा क्षेत्रात झपाट्याने पाणी वाढत असल्याने धरणग्रस्त शेतकऱ्यांनी पाणी उपसा करण्यासाठीचे विद्युत पंप पाइप वायर स्टार्टर आदी साहित्य सुरक्षित स्थळी हलवण्यासाठी शेतकऱ्यांची धावपळ झाली.
वरच्या भागातील स्थिती काय?
नाशिक विभागात पावसाचे प्रमाण कमीअधिक आहे. त्यामुळे काही धरणे भरत आली आहे. सध्या विभागातील ५३७ धरणांमध्ये ११७.९३ टीएमसी म्हणजेच ५६ टक्के पाणीसाठा झाला आहे. तर दारणातून १९ हजार २७६, गंगापूर ८१००, भंडारदरा ५१७६, निळवंडे ८१२२, हतनूर ५३,२९० क्युसेकने पाण्याचा विसर्ग सोडण्यात आला आहे. त्यामुळे जायकवाडी धरणांत पाण्याची आवक सुरू झाली असून धरणांतील पाणीपातळी हळूहळू वाढत आहे.


