मराठवाड़ामुख्य बातमी

सनशाईन कंपनीत आग; घटनेची चौकशी करण्याची अंबादास दानवेंची मागणी

छत्रपती संभाजीनगर: एमआयडीसी वाळूज सी सेक्टरमध्ये कंपनीत लागलेल्या आगीत सहा जणांचा बळी गेला. या घटनेत ११ जण जखमी झाले. मृतातील चार ते पाच जण एकमेकांचे नातेवाइक होते. गेल्या तीन वर्षांपासून ते शहरात राहत होते. त्यांना प्रती ग्लोव्ह्ज दोन रुपये मिळत होते. दिवसभरात आठशे रुपये त्यांना मिळत होते, अशी माहिती घटनेनंतर समोर आली आहे.

सनशाईन कंपनीत लागलेल्या आगीत इर्शाद याचा भाऊ कौसर याचा जीव गेला. ठेकेदार महंमद हसिनोमुद्दीन शेख याच्यासह हे कामगार दिवसभर कंपनीत काम करीत होते. कंपनीच्या मालकाने दिवसभर कामाची मजुरी आणि राहण्यासाठी जागा उपलब्ध करून दिली होती. रविवारी एकच्या दरम्यान कंपनीत आग लागली. काही जण हे बाहेर पडले. तर काही जण जे रूममध्ये अडकले. त्यांचा जीव गेला. सुखरूप बाहेर पडलेल्यांनी या लोकांना फोन केले. मात्र, त्यांनी फोन उचलले नाही. त्यांनी कंपनीत राहिलेल्या काही जणांना कॉल करून उठविण्याचा प्रयत्न केला. तोपर्यंत उशीर झाला आणि गाढ झोपेतच आगीने सहा जणांचा बळी घेतला, अशी माहिती वाचलेल्या काही लोकांनी दिली.

कंपनीला आग लागली त्या वेळी कामगार वरच्या मजल्यावर वेगवेगळ्या खोल्यांमध्ये झोपलेले होते. या वेळी त्या ठिकाणी स्वयंपाकासाठी पाच सिलेंडर आणलेले होते. यात तीन भरलेले तर दोन रिकामे सिलिंडर होते. सुदैवाने आगीचे लोळ त्यापर्यंत पोहचले नाही; अन्यथा आणखी जीवितहानी झाली असती. सिलिंडरचा स्फोट झाला असता तर शेजारील कंपन्यांनाही झळ पोहचली असती. कंपनीला भीषण आग लागल्याची आणि त्यात कामगार अडकल्याची माहिती मिळाल्यानंतर परिसरातील १०८ या रुग्णवाहिकांना कळवण्यात आले असता. वाळूज येथून डॉ. सुशील राऊत, मंगल राठोड, जिकठाण रुग्णालयाचे अनंत पाटील, मुसा शेख, भेंडाळा रुग्णालयाचे डॉ. विशाल आगळे, नितीन लांडगे, बन्सीलालनगर डॉ. काळे, चंदन राजपूत तर सिल्कमिल्क कॉलनी येथील डॉ. हर्षल कोठारी, फहीम खान यांनी तत्काळ घटनास्थळी येऊन आगीत होरपळलेल्या कामगारांना रुग्णालयात दाखल केले.

कंपनीत लागलेल्या आगीच्या घटनेतील एकूण ११ जखमींना घाटीत उपचारासाठी आणण्यात आले होते. सर्व जखमींना किरकोळ जखमा असल्याने त्यांच्यावर उपचार करुन त्यांना रुग्णालयातून सोडण्यात आले. मात्र घटनेनंतर मिळालेल्या माहितीनुसार, मोठ्या संख्येने जखमी आल्यास उपचारांसाठी तयारी करण्यात आली होती. अर्थात जखमींना दाखल करण्यासारखी स्थिती नव्हती म्हणूनच सोडण्यात आले, असे वैद्यकीय अधीक्षक डॉ. सुरेश हरबडे यांनी सांगितले.

रात्री उशिरा वाळूज परिसरात कंपनीत लागलेल्या आगीची माहिती पोलिसांनी घाटी प्रशासनाला घटनेची माहिती दिली. घाटी प्रशासन सज्ज झाले. घाटीत जखमी आणि मृत कामगारांना नेण्यासाठी सामाजिक काम करणारी द हाउस ऑफ होम या संस्थेचे अध्यक्ष किशोर वाघमारे व इरफान शेख, भारत राठोड, शेख शकील, महंमद सलमान, नीलेश जाधव, फैसल खान, संस्थेचे उपाध्यक्ष मुक्तार खान उर्फ (बाबूभाई) यांनीही मदत केली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button