सहाय्यक आयुक्त संदीप खलाटे यांना केले बळीचा बकरा?
स्वतः पाण्यात उतरणाऱ्या अधिकाऱ्यावर फोडलं खापर

पुण्यातील बुधवारी उद्भवलेल्या पूर परिस्थितीचे खापर महापालिकेचे सहाय्यक आयुक्त संदीप खलाटे यांच्यावर फोडण्यात आले आहे. पूरस्थितीचे खापर कोणावर तरी ठेवून आपली पोळी भाजण्याचा प्रत्यय आज पुण्यात आला. खरे तर ही जबाबदारी पालकमंत्री यांनी स्वीकारायला हवी होती. पण तसे होताना दिसत नाही. पूरपरिस्थिती हाताळण्यासाठी कमरे एवढ्या पाण्यात उभे राहून प्रयत्न करणाऱ्या संदीप खलाटे यांना शाबासकी देण्याऐवजी त्यांचे निलंबन करण्यात आले आहे. महापालिका आयुक्त डॉ. राजेंद्र भोसले यांनी याबाबतचे आदेश जारी केले आहेत.
खडकवासला धरणातून मुठा नदीपात्रात सोडलेल्या पाण्यामुळे सिंहगड रस्ता परिसरातील अनेक घरांमध्ये पाणी शिरले होते. त्यामुळे जनजीवन विस्कळीत झाल्याचे दिसून आले. यानंतर केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ, पालकमंत्री अजित पवारांनी परिसरात जाऊन पाहणी केली होती. यावेळी नागरिकांच्या रोषाला सामोरे जावे लागले होते. यानंतर पूरस्थितीचे खापर वरिष्ठ अधिकाऱ्यांवर फोडण्यात आले आहे.
पुण्यातील खडकवासला धरणातून अचानक पाण्याचा विसर्ग वाढवण्यात आल्याने पुण्यातील एकता नगरमध्ये पाणी शिरले. यामुळे नागरिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. यावेळी महापालिकेचे सहाय्यक आयुक्त संदीप खलाटे हे मंगळवारी मध्यरात्रीपासून बुधवारी दिवसभर एकता नगरमध्ये स्वतः पावसांत उभे राहून परिस्थिती हाताळत होतो. अनेकदा पाण्याच्या प्रवाहात उतरुन त्यांनी मदतकार्यात सहभाग घेतला.
या पुरस्थितीला नदीपात्रातील अनधिकृत बांधकामे, जलसंपदा विभाग आणि महापालिकेचा आपत्ती निवारण कक्षातील संवादाचा अभाव कारणीभूत ठरलेला असल्याचा आरोप सत्ताधारी पक्षाच्या नेत्यांनीच केलेला असताना त्याचे खापर पूर परिस्थिती हाताळण्यासाठी स्वतः पाण्यात उतरणाऱ्या अधिकाऱ्यावर फोडण्यात आल्याची चर्चा सध्या पुण्यात रंगली आहे. संदीप खलाटे हे स्वतः त्या दिवशी पाण्यात उतरून मदतकार्य करत असल्याचे दिसून आले होते. सहाय्यक आयुक्तांबरोबरच उपायुक्त संजय शिंदे यांचाही पदभार काढून घेण्यात आला आहे.



