
छत्रपती संभाजीनगर, प्रतिनिधी : केंद्र शासनाच्या प्रस्तावित वाहन अपघात कायद्याला वाहन चालक संघटनांनी कडाडून विरोध केला. हा कायदा लागू करू नये, या मागणीसाठी कालपासून विविध वाहन चालक संघटनांनी संप पुकारला आहे. त्यामुळे कालपासून इंधन कंपनीची वाहने इंधन घेऊन पेट्रोल पंपावर पोचली नाहीत. परिणामी, काल दुपारपासून पेट्रोल पंपांवर एकच गर्दी झाली. रात्री बहुतांश पंप ड्राय झाले. हा संप अजून दोन दिवस चालला तर महाराष्ट्र ठप्प होऊ शकतो.
नवीन वाहतूक कायद्याच्या विरोधामध्ये कालपासून ट्रान्सपोर्ट युनियनने संप पुकारलेला आहे. याचा सर्वाधिक परिणाम पेट्रोल पंपावर जाणवत आहे. जिल्ह्यात कालपासूनच पेट्रोल भरण्यासाठी पेट्रोल पंपावर मोठ्या प्रमाणात गर्दी पाहायला मिळाली. ही गर्दी रात्री दोन वाजेपर्यंत सुरू होती. त्यानंतर काही पेट्रोल पंपावरील इंधन संपले आहे. दरम्यान, आज सकाळपासूनही राज्यातील पेट्रोल पंपांमधील इंधनाचा साठा पूर्णपणे ठप्प झाला आहे. त्यामुळे मालवाहतूक ठप्प झाली आहे. याचा परिणाम राज्यातील दळणवळणावर झाला आहे. इंधनाचा तुटवडा असल्याने स्कुल बस बंद आहेत. त्यामुळे मुलांच्या शळांवर याचा परिणाम झाला.
….
भाजीपालाही महाग
मालवाहतूक बंद असल्याने भाजीपाला महागला आहे. त्यामुळे एकूणच सर्वसामान्यांना या संपाचा पूर्णपणे फटका बसला आहे. तर राज्यातील महामार्गांवर वाहतूक पूर्णपणे विस्कळीत झाल्याचे पाहायला मिळत आहे. यामध्ये अनेक ठिकाणी रुग्णवाहिकाही अडकल्याचे चित्र आहे.
…
विरोध का?
नव्या मोटार वाहन कायद्यात अपघात झाल्याच्या स्थितीत ट्रक चालकाला जबाबदार धरण्यात येणार आहे. या प्रकरणी त्याला १० वर्षांची शिक्षा व १० लाखांच्या आर्थिक दंडाला सामोरे जावे लागेल. या तरतुदीला देशभरातील ट्रक व टँकर चालकांनी विरोध केला आहे. हा कायदा रद्द करण्याच्या मागणीसाठी पेट्रोलियम कंपन्यांच्या टँकर चालकांनी आंदोलनाचे हत्यार उपसले आहे.


