रेल्वे स्थानकावर पायी जाणाऱ्या दिव्यांगाला कारने चिरडलं
भीषण अपघातात दिव्यांगाचा मृत्यू

नंदुरबार : पोलिस सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, रेल्वे स्टेशनकडे जाणाऱ्या रस्त्यावर ८ ऑगस्ट रोजी रात्री साडेबारा वाजेच्या सुमारास एका अनोळखी दिव्यांग व्यक्तीला एका ग्रे रंगाच्या चारचाकी वाहनावरील चालकाने उडवलं. त्याच्या ताब्यातील वाहन हे रस्त्याच्या परिस्थितीकडे दुर्लक्ष करून निष्काळजीपणे भरधाव वेगात चालवून अपंग व्यक्तीला जोराची धडक दिली. यात तो गंभीररित्या जखमी झाल्याने त्याचा मृत्यू झाला. दरम्यान, अपघात झाल्यानंतर अज्ञात वाहनचालक घटनास्थळावरून पसार झाला.
या प्रकरणी विशाल कोमलसिंग राजपूत (रा.मोठा मारूतीमागे कुंभारवाडा, नंदुरबार) यांच्या फिर्यादीवरून नंदुरबार शहर पोलिस ठाण्यात अज्ञात चारचाकी चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान अपघातानंतर दिव्यांग व्यक्तीकडे कुठलेही ओळपत्र नसल्याने त्याची ओळख पटू शकली नाही. या प्रकरणी अधिक तपास पोलिस उपनिरीक्षक विकास गुंजाळ करत आहेत.


