
धुळे : शहराजवळ असलेल्या चितोडपासून काही अंतरावर चितोड आणि रावेर बारीचा घाट आहे. या घाटातून मोटारसायकलने (एमएच ४९, बीडी ९६०७) अनिल अहिरेसह वंदना प्रकाश अहिरे, नर्मदा नथू पवार (रा. वडनेर, ता. मालेगाव, जि. नाशिक) हे जात होते. या वेळी वाळूच्या डंपरने (एमएच २०, ईजी ७२६७) त्यांच्या दुचाकीला समोरून जोरदार धडक दिली आणि डंपरने मोटारसायकलला चिरडत रस्त्याजवळ असलेल्या खड्यात फरफटत नेले. अपघातात वंदना अहिरे आणि नर्मदा पवार यांचा जागीच मृत्यू झाला. तसेच अनिल अहिरे देखील जखमी झाला.
दुचाकी चालवणारा मुलगा अल्पवयीन होता. तो जखमी असून त्याच्यावर हिरे वैद्यकीय महाविद्यालयात उपचार सुरु आहेत. त्याची प्रकृती स्थिर आहे. या प्रकरणी धुळे तालुका पोलीसात डंपर चालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अपघातात मोटारसायकलवरील तरुणासोबत डंपर चालकही जखमी झाला. जखमी दोघांवर हिरे रुग्णालयात उपचार सुरू आहे. त्याचबरोबर अपघाताला कारणीभूत ठरलेले डंपर एका माजी नगरसेवकाच्या नातलगाचे असल्याची माहिती पोलिसांनी प्रसार माध्यमांना दिली आहे.
धुळे शहरातील चितोड व रावेर बारी परिसरात हा अपघात झाला आहे. त्यामुळे याठिकाणी गतिरोधक करावे, सूचना फलक व पथदिवे लावण्यासह रस्त्यावर असलेला चढव उतार कमी करून रस्ता समांतर करावा, अशी मागणी चितोड व रावेर ग्रामस्थांकडून वारंवार प्रशासनाला करण्यात आली आहे. परंतु याकडे प्रशासनाकडून दुर्लक्ष होत आहे. त्यामुळे असे अपघात या रस्त्यावर नेहमी घडत असतात. तात्काळ प्रशासनाच्या वतीने या ठिकाणी गतिरोधक टाकण्यात यावे, अन्यथा ग्रामस्थांच्या वतीने आंदोलन करण्यात येईल, असा इशारा देखील यावेळी ग्रामस्थांनी प्रशासनाला दिला आहे.


