क्राईम

गोदाम मालकाला २० जणांकडून बेदम मारहाण, मालकाचा मृत्यू

ठाणे : डोंबिवलीजवळ गोळवली गावात पार्किंगवरून ट्रक चालक आणि दुचाकीस्वारांमध्ये मोठा वाद झाल. हा वाद इतका विकोपाला गेला की दोघांमध्ये हाणामारी झाली. या घटनेत गोदाम मालक बबलू गुप्ता (वय ३५) याचा मृत्यू झाला आहे. सदर घटनेमुळे परिसरात भीतीचं वातावरण पसरलं आहे.

१३ ऑगस्टच्या रात्री मोहंमद जहागीर नावाचा चालक पेपरने भरलेली पिकअप गाडी घेऊन गोडाऊन समोर आला. गोडाऊन समोर तीन ते चार दुचाकी उभ्या होत्या. त्यावर काही तरुण बसले होते. चालकाने त्या तरुणांना दुचाकी बाजूला करा असे सांगत, मला त्याठिकाणी गाडी उभी करायची असे सांगितले. चालक गाडी मागे पुढे करत असताना तरुणांचा आणि चालकाचा वाद झाला. या वादाचे रुपांतर हाणामारीत झाले. कामगार आणि बबलू गुप्ता हे गोदामाबाहेर आले. तोपर्यंत तरुणाच्या गटाने जवळपास २० पेक्षा जास्त तरुणांना बोलावून घेतले होते. पुन्हा तरुणांच्या टोळक्याने कामगार आणि बबलूला मारहाण केली. या घटनेमुळे घाबरलेल्या कामगारांनी पळ काढला.

दरम्यान, कामगार पळून गेल्याने बबलू एकाकी पडला होता. दुसऱ्या दिवशी सकाळी बबलू गुप्ता बेशुद्ध अवस्थेत गोदामासमोर आढळून आला. त्याला तत्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले, परंतु उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. या घटनेनंतर पोलिसांनी मृतदेह तपासणीसाठी कळवा येथील छत्रपती शिवाजी महाराज शासकीय रुग्णालयात पाठवला असून पुढील तपास सुरू केला आहे. या घटनेनं परिसरात तणावाचं वातावरण निर्माण झालं आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button