
छत्रपती संभाजीनगर : संभाजीनगरमधील जटवाडा परिसरातील ओव्हर गावातील मेकॅनिकल असलेल्या तरुणाच्या त्रासाला कंटाळून १६ वर्षीय तरुणीने विहिरीत उडी घेऊन आयुष्य संपवले. ही घटना रविवार दिनांक १८ रोजी उघडकीस आली. या प्रकरणी आरोपीच्या कुटुंबातील सात जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून यापैकी दोन आरोपींना अटक करण्यात आली आहे.
कासिम पठाण (रा.ओव्हारगाव) असं आरोपीचं नाव आहे. पीडितेच्या वडिलांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटलं आहे की, ”माझी मुलगी ही अकरावीच्या विज्ञान शाखेमध्ये शिकत होती. नेट परीक्षेची तयारी करण्यासाठी ती छत्रपती संभाजीनगरच्या कोकणवाडी भागामध्ये असलेल्या एका खासगी शिकवणीला जात होती. क्लासेसच्या परिसरामध्ये असलेल्या वसहतीगृहात ती राहत होती. आरोपी कासिम गेल्या आठ महिन्यांपासून तिला त्रास देत होता. ”तू माझ्याशी प्रेम कर”, म्हणत तो तिला जबरदस्ती करत होता. सुट्ट्यांमध्ये ती गावी आल्याची संधी साधत त्याने पुन्हा त्रास द्यायला सुरुवात केली. या त्रासाला कंटाळून माझ्या मुलीने विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केली”.
तरुणीच्या वडिलांनी दिलेल्या फिर्यादीनुसार कासिम पठाण, यासीन सुभान पठाण, हरून पठाण यांच्यासह इतर आरोपींनी तरुणीला आत्महत्येस प्रवृत्ती केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी हरसुल पोलिसांनी दोन आरोपींना अटक केली आहे.
या प्रकरणी कुटुंबाविरोधात गुन्हा दाखल झाल्यानंतर दोन आरोपींना अटक करण्यात आली आहे. उर्वरित आरोपींकडून पीडितेच्या कुटुंबियांना धमक्या द्यायला सुरुवात झाली आहे. यातील एका आरोपीने त्यांच्या घरी जाऊन ”आज जेल, कल बेल, बाद मैं वही पुराना खेल”, असं म्हणत धमक्या द्यायला सुरुवात केली आहे. पीडित कुटुंब शेती वस्तीत राहते यामुळे त्यांच्या मनामध्ये भीतीचं वातावरण निर्माण झाला आहे.


