
अन्न, वस्त्र, निवाऱ्यासारखीच वीज ही आपल्या आयुष्यातील आज मूलभूत गरज बनली आहे. विजेशिवाय जगण्याची कल्पनाच करता येणार नाही, इतके अनन्यसाधारण महत्त्व विजेला आहे. मुंबईचा काही भाग वगळता चांद्यापासून बांद्यापर्यंत महाराष्ट्रातील घराघरात वीज पोचवण्याचे काम महावितरण करते. या वीज वितरण यंत्रणेचा कणा असलेल्या जनमित्रांच्या अर्थात लाईनमेनच्या कार्याचा उचित गौरव करण्यासाठी ४ मार्च हा दिवस देशभर ‘लाईनमन दिवस’ म्हणून साजरा करण्यात येत आहे.
मिनिटभरही आपल्या घराचा वीजपुरवठा खंडित झाला की ग्राहक तो कधी सुरू होईल याची वाट पाहत असतात. यादरम्यान महावितरणचे अभियंते आणि जनमित्र यांना कोणत्या परिस्थितीत व विविध अडथळ्यांना तोंड देत रात्रीअपरात्री कोणती व कशी कामे करावी लागतात याची माहिती फारशी कोणाला नसते. परंतु अभियंते आणि जनमित्र यांची अत्यंत प्रतिकूल परिस्थितीतही विद्युतसेवा देण्याची धडपड आणि अथक प्रयत्न समजून घेतले तर त्यांच्या कर्तव्य बजावण्याच्या प्रयत्नांना खरा न्याय दिल्यासारखे होईल. विजेच्या निर्मितीनंतर पारेषण, वितरण अशा टप्प्यांमध्ये ग्राहकांच्या दारापर्यंत वीजपुरवठा केला जातो. महानगरापासून ते खेड्यापाड्यापर्यंत सर्व प्रकारच्या ग्राहकांना सुरळीत वीजपुरवठा करण्यासाठी महावितरणचे अभियंते व जनमित्रांना दक्ष राहावे लागते. वीज दिसत नाही. वीजयंत्रणेत काम करण्याचा कितीही वर्षांचा अनुभव असला तरी विजेशी मैत्री होऊ शकत नाही. त्यामुळे एखाद्या क्षणी अनावधानाने झालेली चूकही जीवावर बेतू शकते. वीजपुरवठा खंडित झाल्यानंतर रात्री-अपरात्री अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत व धोकादायक आव्हाने पेलून अभियंता व जनमित्रांना वीजपुरवठा सुरळीत करण्याचे कर्तव्य बजवावे लागते. वीजपुरवठा खंडित झाला की तो पूर्ववत होईपर्यंतचा काळ हा वीजग्राहकांना नकोसा असतो, एवढी विजेची गरज प्रत्येकाच्या दैनंदिन जीवनात निर्माण झाली आहे. वीजपुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी साधारणतः उन्हाळा ते पावसाळ्यातील ८ ते ९ महिन्यांचा कालावधी अतिशय आव्हानात्मक व खडतर असतो. उन्हाचा तडाखा, तापलेली वीजयंत्रणा, वाढलेली विजेची मागणी त्यानंतर वादळे, अवकाळी पाऊस व त्यानंतरचा मान्सूनचा संततधार पाऊस, पूर अशा प्रतिकूल परिस्थितीत वीजपुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी महावितरणचे जनमित्र सज्ज असतात. गेल्या दोन-तीन वर्षांमध्ये महाराष्ट्रात धडकलेले ‘निसर्ग’ व ‘तौक्ते’ चक्रीवादळे, राज्यातील विविध ठिकाणची पूरस्थिती आणि महाभयंकर कोविडच्या महामारीमुळे वीजक्षेत्रासमोर अत्यंत कठीण परिस्थिती होती. अशाही स्थितीत महावितरणच्या प्रत्येक जनमित्राने वीजग्राहकांना प्रकाशात ठेवण्यासाठी अविरत, अथक कर्तव्य बजावले आहे. खरे पाहता महावितरणच्या पुरुष व महिला तंत्रज्ञ कर्मचाऱ्यांवर २४ तास वीजपुरवठा सुरळीत ठेवण्यासह इतर विविध ग्राहकसेवा देण्याची जबाबदारी आहे. यासोबतच थकीत वीजबिलांची वसुली करणे, थकबाकीदारांचा वीजपुरवठा खंडित करणे, वीजचोरीविरोधात कारवाई करणे आदी महत्वाची कामे करावी लागतात. महावितरणच्या ग्राहकसंख्येत दरवर्षी सुमारे १० लाखांची भर पडत आहे. सोबतच विजेची मागणीही सुमारे १० टक्क्यांनी वाढत आहे. ३३/११ किव्हो क्षमतेचे ४००० पेक्षा अधिक उपकेंद्र आणि स्विचिंग स्टेशन्स, २५ हजार उच्चदाब वीज वाहिन्या, सुमारे ८ लाख वितरण रोहित्रे, ११ किव्हो क्षमतेच्या ३ लाख ३० हजार किमी वाहिन्या आणि ३३ किव्हो क्षमतेच्या ५० हजार किमी वाहिन्यांचा समावेश असलेल्या विशाल वितरण यंत्रणेच्या माध्यमातून महाराष्ट्राच्या ३.०८ हजार चौरस किलोमीटर भौगोलिक क्षेत्रामधील ४१ हजार ९२८ गावे आणि ४५७ शहरांमध्ये वीजपुरवठा करण्यात येत आहे.
– ज्ञानेश्वर आर्दड,
जनसंपर्क अधिकारी,
महावितरण, छत्रपती संभाजीनगर



