महाराष्ट्र

चंद्रपुरात वाघाच्या हल्ल्यात महिला ठार

चंद्रपूर : तळोधी-बाळापूर वनपरिक्षेत्रातील देवपायली नियतक्षेत्रातील जनाबाई जनार्दन बागडे (५१), असे मृत महिलेचे नाव आहे. जनाबाई या धानातील निंदण काढण्यासाठी गेल्या होत्या. सायंकाळी परत जात असताना वाघाने त्यांच्यावर हल्ला करून ठार मारले. सायंकाळ होऊनही जनाबाई घरी न परतल्याने कुटुंबीयांनी शोधाशोध सुरू केली. कुठेही थांगपत्ता न लागल्याने वनविभागाला माहिती देण्यात आली. वनविभागाचे अधिकारी व कर्मचारी तातडीने घटनास्थळी दाखल झाले. शोध मोहीम राबविली. पाऊस सुरू असल्याने शोध लागला नाही. गुरुवारी सकाळी वनविभागाने पुन्हा शोध मोहीम राबविली असता शेताला लागून असलेल्या कक्ष क्रमांक १३२मध्ये जनाबाई यांचा मृतदेह आढळला.

नागभीड वनपरिक्षेत्रातील मेंढाळा येथे शेतात काम करणाऱ्या शेतकऱ्यावर वाघाने हल्ला करून जागीच ठार केल्याची घटना मंगळवारी घडली होती. सदर महिला ठार झाल्याचे घटनास्थळ हे केवळ दोन किमी असून हल्लेखोर एकच वाघ असल्याची शक्यता वनविभागाच्या सूत्रांनी ‘मटा’शी बोलताना व्यक्त केली. त्यादृष्टीने वनविभागाने कार्यवाही सुरू केली आहे. वनविभागाने परिसरात गस्त वाढविली असून सतर्कतेच्या सूचना दिल्या आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button