NathSagar Dam | नाथसागर जलाशय तहानलेलाच!
जुलै संपत आला तरीही फक्त 4.22 टक्के साठा शिल्लक

अर्चना काळे-पंडित
छत्रपती संभाजीनगर : जिल्ह्यातील जायकवाडी येथील नाथसागर जलाशय आशिया खंडातील सर्वांत मोठे मातीचे धरण आहे. पण, यंदा जुलै संपत आला तरीही आजपर्यंत 26 जुलै नाथसागर जलाशयातील पाणी पातळी चिंताजनक स्थितीत आहे. आज सकाळी 6 वाजता प्राप्त झालेल्या अहवालानुसार, जलाशयातील एकूण पाणी साठा फक्त 4.22 टक्के राहिला आहे.
धरणाची पाणी पातळी फुटांमध्ये 1496.38 असून, मीटरमध्ये ती 456.097 आहे. जलाशयातील एकूण पाणीसाठा 829.731 दलघमी असून, त्यापैकी जिवंत पाणीसाठा फक्त 91.625 दलघमी आहे. मागील वर्षी आजच्या दिवशी जलाशयातील उपयुक्त पाणीसाठा 606.365 दलघमी होता, जो 27.93 टक्के होता. मात्र, यंदा पाण्याची स्थिती अत्यंत गंभीर असून, पाण्याचा योग्य वापर करण्याची गरज आहे. जिल्ह्यातील आज सकाळी आठ वाजतापर्यंत मागील २४ तासांत 7 मिमी पाऊस झाला. या पावसाळ्यात आतापर्यंत एकूण पर्जन्यमान 229 मिमी नोंदवले गेले आहे. उजवा आणि डावा कालवा विसर्ग तसेच जलविज्ञ केंद्र विसर्ग शून्य असल्याचे दिसून येते. सांडवा विसर्ग देखील शून्य आहे.
पाण्याची आवक 24 तासात 939 क्युसेक नोंदवली गेली आहे. 1 जून 2024 पासून एकूण पाण्याची आवक 60.0290 दलघमी असून, सोडलेला विसर्ग शून्य आहे.
जलाशयातील कमी पाणी पातळीमुळे जलस्रोतांच्या व्यवस्थापनाची अत्यंत आवश्यकता आहे. पाणी वापरावर नियंत्रण ठेवणे आणि पाण्याचा योग्य वापर करणे यासाठी प्रशासनाने तत्काळ उपाययोजना कराव्यात, असे आवाहन नागरिकांना करण्यात येत आहे.
मराठवाड्यासाठी नाशिकमधून विसर्ग
मराठवाडा वगळता गेल्या दोन दिवसांपासून राज्याच्या अनेक भागात रिपरिप तर काही ठिकाणी मुसळधार पाऊस होत आहे. त्यातच काल सकाळी नाशिक जिल्ह्यातील नांदूर माध्यमेश्वरमधून पाण्याचा विसर्ग वाढविण्यात आला आहे. नाशिकछनरमधून निघणारे हे पाणी मराठवाड्याच्या फायद्याचे समजले जाते. ते नाथसागर धरणात येते. नाशिकमध्ये मोठा पाऊस झाला तर जायकवाडी धरण भरण्यास मोठी मदत होणार आहे.
छोटा समुद्रच
मराठवाड्यातील जवळजवळ २.४० लाख हेक्टर क्षेत्र नाथसागर धरणामुळे ओलिताखाली आलेले आहे. आशिया खंडातील मोठे मातीचे धरण अशी ख्याती असलेले जायकवाडी धरण ६० किलोमीटरची लांबी आणि दहा किलोमीटरची रुंदी इतके विस्तिर्ण आहे. जायकवाडी धरणाची तब्बल १०२ टीएमसी पाणीसाठ्याची क्षमता आहे. हे धरण एकदा पूर्ण भरले तर दोन वर्षाच्या शेतीच्या पाण्याची आणि ४ वर्षांच्या पिण्याची पाण्याची सोय होते. म्हणून या धरणाला मराठवाड्याचा छोटा समुद्र समजला जातो.
राज्यातील मोठ्या धरणाची स्थिती अशी
राज्यात दिनाक २५ जुलै सकाळी ८ पर्यंत भंडारदरा धरण (प्रवरा नदी) शून्य, निळवंडे धरण (प्रवरा नदी)) शून्य, देवठाण (आढळा नदी) शून्य, भोजापूर (म्हाळुंगी) शून्य, ओझर (प्रवरा नदी) शून्य, कोतूळ (मुळा नदी) २९५३३ क्युसेक, मुळाडॅम (मुळा) शून्य, गंगापूर (डॅम) शून्य, दारणा शून्य, नां. मध्यमेश्वर सकाळी ८ पर्यंत ५५७६ क्युसेक तर सकाळी ९ वाजता ८८०४ क्युसेक, जायकवाडी शून्य, विसर्ग सुरू आहे.


