RTI Activist Guru Waghmare | मृत वाघमारेनं मांड्यांवर 22 शत्रूंची नावं टॅटूत कोरली; स्पा मालकासह तिघांना अटक

मुंबई : विलेपार्लेसह मुंबईत ठिकठिकाणी कधी पोलिसांचा खबरी, तर कधी आरटीआय कार्यकर्ता म्हणून वावरणाऱ्या गुरू वाघमारे (५१) याच्या हत्येचा छडा लावण्यात मुंबई पोलिसांना यश आले आहे. गुन्हे शाखेच्या पथकांनी हत्या करणाऱ्या फिरोझ अन्सारी आणि शाकिब अन्सारी या दोन मारेकऱ्यांना, तसेच त्यांना सहा लाखांची सुपारी देणाऱ्या वरळीच्या ‘सॉफ्ट टच स्पा’चा मालक संतोष शेरेकर याला वरळी पोलिसांनी अटक केली. वाघमारे याला आपले बरेवाईट होण्याची भीती वाटत होती आणि म्हणूनच त्याने आपल्या मांड्यांवर २० ते २२ शत्रूंची नावे गोंदवून घेतली होती. यामध्ये संतोष शेरेकर याच्या नावाचाही समावेश आहे.
विलेपार्ले येथील गुरू वाघमारे याची वरळीतील सॉफ्ट टच स्पामध्ये नियमित ये-जा होती. त्यामुळे येथील बहुतांश कर्मचारी त्याच्या परिचयातील होते. नुकत्याच झालेल्या वाढदिवसाची स्पामधील कर्मचाऱ्यांना पार्टी देण्यासाठी मंगळवारी रात्री तो वरळीत आला होता. दोन पुरुष आणि एका महिला कर्मचाऱ्याला घेऊन वाघमारे सायन येथील एका रेस्टोरंट अँड बारमध्ये गेला. या ठिकाणी खाणे-पिणे झाल्यानंतर चौघेही पुन्हा साडेबाराच्या सुमारास स्पामध्ये पोहोचले. काही वेळ गप्पा मारल्यानंतर दोघे कर्मचारी स्पा बाहेर पडले आणि यानंतर आतमध्ये आलेल्या दोघांनी महिला कर्मचाऱ्यासमोर धारदार कैचीने वाघमारे याची हत्या केली. बुधवारी याप्रकरणी हत्येचा गुन्हा दाखल झाल्यानंतर वरळी पोलिस आणि गुन्हे शाखेची वेगवेगळी पथके कामाला लागली.


