
शिर्डी येथील साईबाबा देवस्थान देशभर प्रसिद्ध झाले आहे. देशातील दुसऱ्या क्रमांकाचे श्रीमंत देवस्थान शिर्डी आहे. यामुळे शिर्डीत देशभरातून भाविक येत असतात. त्यासाठी शिर्डी सारख्या छोट्या शहराचा विकास चांगला करण्यात आला. रेल्वे स्टेशन आणि विमानतळ सुरु करण्यात आले. त्याच शिर्डीतील विमानतळाला आता नोटीस देण्यात आली आहे. आठ कोटी तीस लाखांचा कर थकल्या प्रकरणात शिर्डी विमानतळाला ही नोटीस शिर्डी ग्रामपंचायतीने बजावली आहे. महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम 1958 कलम 129 अन्वये ही नोटीस बजावल्यामुळे खळबळ निर्माण झाली आहे.
शिर्डी विमानतळ हे कोपरगाव तालुक्यातील काकडी – मल्हारवाडी ग्रामपंचायतीच्या हद्दीत येते. विमानतळ प्राधिकारणाने काकडी ग्रामपंचायतचा 8 कोटी 30 लाखांचा कर थकवला आहे. यामुळे ग्रामपंचायतीने शिर्डी विमानतळ प्रशासनाला जंगम मालमत्ता जप्तीचे वॉरंट बजावले आहे. 2017 पासून विमानतळ प्रशासनाकडून विविध स्वरुपातील कर थकीत आहे. अनेकदा पाठपुरावा करूनही थकबाकी जमा होत नाही. यामुळे ग्रामपंचायतीने हे पाऊल उचलले आहे.
शिर्डी विमानतळाची उभारणी करताना गावातील हजारो हेक्टर जमिनीचे भूसंपादन करण्यात आले होते. त्यावेळी काकडी गावात पायाभूत सुविधा आणि ग्रामविकासाठी निधी देण्याचे आश्वासन महाराष्ट्र राज्य विमानतळ विकास प्राधिकरणाने दिले होते. मात्र या सर्व आश्वसनांची पुर्तता झाली नाही. त्यातच ग्रामपंचायतीचा 8 कोटी 30 लाखांचा कर प्राधिकरणाने थकवला आहे. कर थकल्याने गावातील विकासाला अडथळे निर्माण होत असल्यामुळे हे पाऊल उचलले आहे.



