
सांगली : प्रतिनिधी
इस्लामपुरातील प्राची विजय माने (वय २१, सध्या रा. आंबेठाण, ता. खेड, जि. पुणे) या तरुणीचा एकतर्फी प्रेमातून खून करण्यात आला. चाकण औद्योगिक वसाहतीतील आंबेठाणमध्ये रविवारी (दि. २८) रात्री साडेदहा ते अकरा वाजण्याच्या दरम्यान ही घटना घडली. याप्रकरणी अविराज रामचंद्र खरात (रा. माने मळा, साखराळे, ता. वाळवा, जि. सांगली) या संशयित आरोपीस पोलिसांनी कराडजवळ जेरबंद केले.
चाकणी येथे प्राचीच्या खुनानंतर अविराज पळून गेला होता. तो साता-याकडे दुचाकीवरून गेल्याची माहिती मिळताच पोलिसांनी क-हाडजवळ सापळा लावून त्याच्या मुसक्या आवळल्या. त्याला न्यायालयापुढे हजर केले असता तीन ऑगस्टपर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली. म्हाळुंगे औद्योगिक वसाहत पोलिस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक नितीन गिते यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास सुरू आहे.
संशयित अविराज हा मूळ जत तालुक्याचा आहे. काही वर्षांपूर्वी त्याचे वडील चरितार्थासाठी इस्लामपूर परिसरात कुटुंबासह आले होते. येथे त्यांना एका साखर कारखान्यात नोकरी मिळाली होती. प्राची मूळची चरेगाव (जि. सातारा) येथील आहे. तीदेखील कुटुंबीयांसह साखराळे येथे मामांकडे राहण्यास आली होती. सध्या भावंडांच्या शिक्षणासाठी पुण्यात राहत होती. तिच्या मृतदेहावर चरेगाव येथे अन्त्यसंस्कार करण्यात आले.


