बांगलादेशात कोल्हापूरचे 15 विद्यार्थी अडकले, त्यांना आणण्यासाठी सरकारने प्रयत्न करावेत
सतेज पाटलांची मागणी

कोल्हापूर : रक्तरंजित संघर्ष सुरु असलेल्या बांगलादेशमध्ये कोल्हापूरचे 15 विद्यार्थी अडकले आहेत. अडकलेल्या विद्यार्थ्यांच्या सुटकेसाठी माझी वरिष्ठ स्तरावर चर्चा सुरू असल्याचे आमदार सतेज पाटील यांनी म्हटले आहे. बांगलादेशमध्ये अडकलेल्या15 विद्यार्थ्यांनी माझ्याशी संपर्क केला असल्याचे त्यांनी सांगितले. सतेज पाटील यांनी सांगितले की, अजून विद्यार्थी आणि नागरिक असतील तर त्यांनी जिल्हा प्रशासनाशी संपर्क साधावा. बांगलादेशमध्ये15 विद्यार्थी कुठे आहेत हे जाहीरपणे सांगणे योग्य नाही. त्यांना सुखरूप आणण्यासाठी सरकारने प्रयत्न करावेत.त्यांच्या सुटकेसाठी माझी वरिष्ठ स्तरावर चर्चा सुरू असल्याचे ते म्हणाले.
भारतीय दूतावासातील 190 कर्मचारी परतले
दरम्यान, भारतीय दूतावासातील 190 कर्मचारी बांगलादेशातून परतले आहेत. वृत्तानुसार, ढाकामध्ये अजूनही 20 ते 30 कर्मचारी आहेत. हिंसाचारामुळे बांगलादेशचे 75 हजार कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे. बांगलादेशात झालेल्या हिंसक निदर्शनांमुळे गेल्या 15 दिवसांत 75 हजार कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे. यामध्ये वस्त्रोद्योगाला सर्वाधिक 20 हजार कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे.
एअर इंडिया, विस्तारा, इंडिगो आजपासून ढाक्यासाठी विमानसेवा सुरू करणार
दुसरीकडे, एअर इंडिया, विस्तारा आणि इंडिगो बुधवारी दिल्ली ते ढाका त्यांची नियोजित उड्डाणे चालवतील. बांगलादेशच्या राजधानीतून लोकांना परत आणण्यासाठी एअर इंडियाही विशेष विमान पाठवू शकते.



