
मुंबई : प्रतिनिधी
मराठा आरक्षणाबाबत भूमिका स्पष्ट करावी, अशी मागणी करत मराठा आंदोलकांनी मंगळवारी ‘मातोश्री’ निवासस्थानाबाहेर आंदोलन केले होते. यानंतर मराठा आंदोलकांनी आपला मोर्चा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्याकडे वळवला. मराठा आंदोलक फडणवीस आणि अजितदादांच्या निवासस्थानाकडे जात असताना पोलिसांनी रोखले असता पोलिस आणि आंदोलक यांच्यात बाचाबाची झाली.
दरम्यान, उपमुख्यमंत्री फडणवीस आणि अजितदादा यांनी मराठा आरक्षणाबाबत भूमिका स्पष्ट करावी, या मागणीसाठी मराठा आंदोलक रमेश केरे-पाटील यांच्या नेतृत्वाखाली कार्यकर्ते ‘सागर’ आणि ‘देवगिरी’ बंगल्याकडे निघाले होते. पण, पोलिसांनी रमेश केरे-पाटील यांच्यासह कार्यकर्त्यांना गिरगाव येथे रोखले.
आपले निवेदन पोहोचविण्याची व्यवस्था करू. पण, पुढे जाता येणार नाही. ट्रॅफिक जॅम होत आहे. त्यामुळे तुम्ही येथे थांबा, अशी विनंती पोलिसांनी केरे-पाटलांना केली.
पण, मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण देण्याबाबत अजितदादांच्या पक्षाची भूमिका आम्हाला विचारायची आहे, असे केरे-पाटलांनी म्हटले. यानंतर तुम्हाला जात येत नाही, म्हणत पोलिसांनी केरे-पाटलांना रोखले.


