महाराष्ट्र

वेदनांची स्पंदने

1999 पासून संपूर्ण मोहोळ तालुक्याला, सोलापूर जिल्ह्याला चिरपरिचित असलेल्या डॉक्टर सी. के. पाटील यांच्या वैद्यकीय सेवेचा पवित्र स्पर्श लाभलेल्या ‘पाटील हॉस्पिटलमध्ये’ माझ्या आणि डॉ. प्रमोद पाटील या माझ्या पतीच्या रूग्णसेवेला प्रारंभ झाला. ग्रामीण भागातल्या या वैद्यकीय सेवेला दोन तपे लोटली. या क्षेत्रातील नाना विविध अनुभवांची शिदोरी आजही जीवनाला नवा अर्थ, नवा परिमाण देऊन जाते.
 वेदना शारीरिक असो वा मानसिक असो ती एक नवा अनुभव, नवा धडा देऊन जाते. आयुष्यात सुखा इतकंच दुःखाचं असणं जरुरी असतं. कारण सुख माणसाला सुस्ती देतं तर दुःख माणसाला आतून, बाहेरून हलवून त्याच्या सामर्थ्याची परीक्षा घेतं. त्याच्यातल्या निद्रिस्त भाव भावनांना नवी जाग देतं. दुःखामध्ये सृजनाचं अतिव सामर्थ्य असतं. यासाठीच तर सुखाच्या लहरी इतकी च वेदनांची स्पंदनं आयुष्यात जरुरीची असतात. यासाठीच तर कुंतीने दुःखाचा वर मागितला असावा. वेदनेचा  सृजनाशी एक घट्ट धागा असतो.
आयुष्याकडे पाहण्याचा नवा दृष्टिकोन निर्माण करण्यासाठी,अहंकाराचा निखारा विझविण्यासाठी,हवेत तरंगणारे पाय जमिनीवर आणण्यासाठी,या जगाची नव्याने ओळख होण्यासाठी, आयुष्यातल्या चुकांकडे अंगुली निर्देश करण्यासाठी, नवनिर्माणाच्या कोवळ्या अंकुरासाठी वेदना हवीच! मग ती देहाची असो वा मनाची असो, मग ती स्वतः अनुभवलेली असो व इतरांनी अनुभवलेली असो. या सदरात आपण अशाच वेदनांच्या स्पंदनांना उजागर करणार आहोत. या वेदनांच्या बरोबरच त्या वेदनेतून मिळालेला निरामय जीवनाचा मंत्रही आपण ऐकणार आहोत. ग्रामीण भागातील लोकजीवन आणि शहर शहरी भागातील लोकजीवन यांच्यात आजही जमीन आसमानाचे अंतर आहे. खेड्यामध्ये लोक शेतीशी निगडित असतात.  बेभरवशाचा निसर्ग आणि हमीभावाची वानवा असलेल्या शेतीमुळे ग्रामीण भागातील लोकांचे जीवन आजही अत्यंत दयनीय आहे. आर्थिक परिस्थितीचा आणि आरोग्याचा एकमेकांशी जवळचा संबंध असतो. कारण आर्थिक दुरावस्था सहजच आरोग्याच्या दुरावस्थेकडे नेते. गांधीजी ‘खेड्याकडे चला’ असे त्यावेळी का म्हणाले हे ग्राम जीवन जवळून पाहताना प्रकर्षाने जाणवते. थोर कवी रवींद्रनाथ टागोर यांनी म्हटले होते की भारत मातेचे चित्र कसे  असेल तर ते’ खपाटीला पोट चिकटलेल्या हातात रडणारे मूल असलेल्या कळकट साडी नेसलेल्या स्त्रीचे चित्र असेल’ असे कुठेतरी पूर्वी मी वाचलेले होते. त्या ओळी अगदी जशाच्या तशा आठवत नसल्या तरी आर्थिक दुरावस्थेत जगत असलेली स्त्री हीच भारत माता असा त्यांचा आशय होता हे नक्कीच! आजही ग्रामीण स्त्री अज्ञान ,अंधश्रद्धा, जुनाट रूढी परंपरा, दारिद्र्य यांच्या चिखलात खोलवर रुतली आहे. आजही ग्रामीण भागातील शेतकरी त्याच्या विवंचनेने मेटाकुटीला आलेला आहे. त्याच्या विवंचनेचा त्याच्या आरोग्याशी अन्योन्य संबंध आहे. म्हणूनच ही आरोग्यगाथा वेदनांच्या स्पंदनाने बद्ध आहे.कधी मनाच्या तळाशी उसळलेला,रोरावणारा अस्वस्थ समुद्र देहाला वेदनांनी वेढून टाकतो.कधी देहाच्या वेदना मनाला उसवून टाकतात.जगातल्या या वेदनांचा असा परिचय रोज होतो.
इतरांचे पर्वताएवढे दुःख पाहिले की आपण केलेला राईचा पर्वत पुन्हा राई होतो आणि या जगात किती सगळं दुःख आहे, माझ्या वाट्याला मात्र खूपच कमी आहे. खरंच मी खूप सुखी आहे याची जाणीव होते. मन कुठेतरी समाधानी होते,शांत होते आणि एक  कृतज्ञतेची रुपेरी किनार काळजाच्या मेघाला नवी झळाळी देते.शेवटी काय- ‘प्रत्येकाने जगावं आपापल्या परीनं
कारण तोच देतो गारवा वळवाच्या सरीनं’
डॉ. स्मिता पाटील मोहोळ जिल्हा सोलापूर

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button