
छत्रपती संभाजीनगर, प्रतिनिधी: माता म्हणजे मायेचा सागरच, आपल्या मातेविषयी मुलांमध्ये आदर वाढावा, त्यांना भारतीय संस्कृती कळावी, या उद्दात हेतूने मुकुंदवाडीतील मुकुंदनगर परिसरात असलेल्या राजे संभाजी इंग्लिश स्कूलमध्ये आज दि.13 जानेवारी रोजी सर्व विद्यार्थ्यांच्या हस्ते आप-आपल्या मातांचे पूजन करण्यात आले. दरम्यान, शाळेची पालक सभा झाली. यावेळी पालकांना तृतीय घटक चाचणी परीक्षा निकाल दाखवण्यात आले.
विद्यार्थ्यांना त्यांच्या आईप्रति आदर वाढावा, त्यांना आईचे महत्त्व कळावे, त्यांनी संस्कारशील व्हावे, या हेतूने शाळेत माता पूजन उपक्रम घेतला गेला आहे. तसेच विद्यार्थ्यांकडून उस्फूर्त प्रतिसाद मिळाला. महिला पालकांनी उत्साहात सकाळी नऊ वाजता सुंदर तयारी करून सोबत पूजेचे पूर्ण ताट, एक रिकामे ताट, पाण्याचा लोटा घेऊन हजेरी लावली. मुलांनी आपल्या आईचे पूजन केले.
दरम्यान,पालक सभेमध्ये विज्ञान प्रदर्शन, क्रीडा स्पर्धा, वार्षिक स्नेहसंमेलन, आनंदनगरी, परीक्षा निकाल, पाल्याचा प्रगती अहवाल अशा अनेक विषयांवर चर्चा झाली.संस्थेचे अध्यक्ष एस.के.महाले यांनी पालकांना मार्गदर्शन केले. यावेळी संस्थेच्या संचालिका श्रीमती महाले, संस्थेचे संचालक कुणाल महाले हे देखील उपस्थितीत होते.या कार्यक्रमासाठी सर्व शिक्षक-शिक्षिका, शाळा प्रशासन यांनी परिश्रम घेतले.



