
छत्रपती संभाजीनगर, प्रतिनिधी : नवरा-बायकोचे कितीही मोठे भांडण झाले तरी घरासाठी, संसारासाठी ते एकत्र येतात, असे म्हटले जाते. पण, शहरातील एन- 2 परिसरातील नालंदा सोसायटीत नवरा-बायकोच्या भांडणातून बायकोने तिसर्या मजल्यावरील राहते घरच पेट्रोल टाकून पेटवून दिल्याचा धक्कादायक प्रकार घडला. यात घरातील संसार उपयोगी साहित्य खाक होऊन लाखो रुपयांचे नुकसान झाले. ही घटना आज घडली.
नवरा-बायको म्हटले की कधी ना कधी भांडण होतेच. पण, नालंदा सोसायटीतील एका दांपत्याचे भांडण एवढे विकोपाला गेले की बायकोने पेट्रोल टाकून घरालाच आग लावली. काही क्षणात आगीने रौद्ररूप धारण केले.
यात घरातील सोपा, कापडे, बेड, कागदपत्रे आणि इतर साहित्य खाक झाले. अचानक आग पाहून शेजारी गोंधळून गेले. भयभीत होऊन त्यांनी घटनेची माहिती तत्काळ महापालिकेच्या अग्निशमन विभागाला दिली. दोन तासानंतर ही आग आटोक्यात आली. अग्निशमन विभागाचे जवान वेळेत आले नसते तर आगीने संपूर्ण बिल्डिंग व्यापून आजूबाजूच्या घरांचेही मोठे नुकसान झाले असते. या प्रकरणी गुन्हा नोंद करण्याची प्रक्रिया सुरू आहे.


