क्राईम

Harashad Patankar | तुरुंगातून सुटलेल्या कुख्यात गुंडाची नाशिकमध्ये रॉयल मिरवणूक

'बॉस इज बॅक'च्या घोषणांनी शरणपूरचा परिसर दणाणला

नाशिक:  नाशिकमध्ये अलीकडेच हर्षद पाटणकर (Harshad Patankar) या गुंडाला तुरुंगातून सोडण्यात आले.  यानंतर या गुंडाच्या समर्थकांनी त्याची शहरात जंगी मिरवणूक काढली. या मिरवणुकीची नाशिकमध्ये (Nashik Crime) चांगलीच चर्चा रंगली आहे. ही मिरवणूक म्हणजे एकप्रकारे पोलीस यंत्रणेलाच आव्हान असल्याचे आता बोलले जात आहे. त्यामुळे आता याप्रकरणात पोलीस काय कारवाई करणार, हे पाहावे लागेल.

एमपीडीए अंतर्गत कारागृहात असणाऱ्या हर्षद पाटणकर याची नुकतीच नाशिकरोड मध्यवर्ती कारागृहातून सुटका करण्यात आली होती. यानंतर शरणपूर रोड परिसरात पाटणकरच्या समर्थकांनी त्याची जंगी मिरवणूक काढली. यावेळी एक छोटेखानी रोड शो देखील झाला. या मिरवणुकीत तडीपार गुंड, सराईत गुन्हेगारांसह  टवाळखोरांचाही सहभाग होता. या मिरवणुकीत चारचाकी महिंद्र एक्सयुव्ही 300 आणि 10 ते 15 बाईकचा सहभागी होत्या. शरणपूर रोडवरील बैथेल नगर ते आंबेडकर चौक, साधू वासवाणी  रोड, शरणपूर रोड परिसरातून हर्षद पाटणकरची मिरवणूक काढण्यात आली. या घटनेमुळे गुन्हेगारांवर पोलिसांचा वचक राहिला आहे की नाही, असा सवाल उपस्थित केला जात आहे.

ही मिरवणूक आणि रोड शो सुरु असताना वाहनांच्या कर्णकर्कश हॉर्नच्या आवाजाने शरणपूर   परिसर दणाणून गेला होता.   याशिवाय, मिरवणुकीतील सहभागी झालेले टवाळखोर अर्वाच्य भाषेत शिवीगाळ करत होते. या सगळ्यांकडून बॉस इज बॅकच्या घोषणाही दिल्या जात होत्या. यानंतर हर्षद पाटणकरच्या समर्थकांनी  सोशल मीडियावर काही व्हीडिओ अपलोड केले. हे व्हीडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून त्याची जोरदार  चर्चा आहे. या घटनेची पोलिसांनी गंभीर दखल घेतली आहे. मिरवणूक काढून जमावबंदी आदेशाचे उल्लंघन केल्या प्रकरणी, दहशत माजविल्याप्रकरणी  सरकारवाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

हर्षद पाटणकर गुन्ह्यांसाठी कुख्यात

अंकुश शिंदे यांनी जुलै महिन्यात नाशिकच्या आयुक्तपदाची सूत्रे स्वीकारल्यानंतर झोपडपट्टीदादाविरोधी कलमान्वये (एमपीडी) हर्षद पाटणकर याच्यावर कारवाई झाली होती. त्याच्याविरोधात सरकारवाडा, पंचवटी, इंदिरानगर, उपनगर या पोलीस ठाण्यांमध्ये गंभीर स्वरुपाचे गुन्हे दाखल आहेत. यात जबर दुखापत, चोरी, घरफोडी, शिवीगाळ व दमदाटी, खुनाचा प्रयत्न, हत्यार बाळगणे अशा गुन्ह्यांचा समावेश आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button