देश -विदेश

जपानमध्ये 7.6 रिश्टर स्केलचा भूकंप, त्सुनामीचा इशारा

नवी दिल्ली : नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी   जपानमध्ये भूकंपाचे तीव्र धक्के जाणवले आहेत. जपानमध्ये सोमवारी ( 1 जानेवारी ) 7.6 रिश्टर स्केल’ तीव्रतेचा जोरदार भूकंपाचा धक्का बसला. या तीव्रतेच्या भूकंपामुळे समुद्रात 5 मीटरपर्यंतचा लाटा उसळण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यामुळे समुद्र किनारी राहणार्‍या नागरिकांनी  उंच ठिकाणी आश्रय घेण्याचे आवाहन जापानच्या सरकारकडून करण्यात आली आहे.  जपानच्या हवामान विभागानं त्सुनामीचा इशारा दिला आहे.

 नवीन मोटार वाहन कायद्याविरोधात टँकरचालकांचा संप, नवी मुंबईत संपाला हिंसक वळण
नवी दिल्ली :  अपघाताला आळा बसावा यासाठी केंद्र सरकारने नवीन मोटार वाहन  कायदा आणला असून या कायद्याला  इंधनाची वाहतूक करणार्‍या टँकरचालकांनी विरोध दर्शविला असून, आज सोमवार (1 जानेवारी) पासून संपाचे हत्यार उपसले आहे. यामुळे देशातील अनेक पेट्रोल पंपावर इंधनाचा तुटवडा जाणवू शकतो.   नवीन मोटार वाहन कायद्यानुसार ट्रकमुळे एखादा व्यक्ती जखमी झाल्यास त्याला तत्काळ रुग्णालयात नेले पाहिजे, तसे न केल्यास आणि ट्रकचालक दोषी आढळून आल्यास त्याला सात वर्षांची शिक्षा आणि सात लाख रुपयांच्या दंडाची तरतूद करण्यात आली आहे. याला इंधन वाहतूक करणार्‍या टँकरचालकानी विरोध दर्शविला आहे. त्यामुळे पेट्रोल- डिझेलचा तुटवडा निर्माण होण्याच्या भितीने  पेट्रोल पंपावर इंधन भरण्यासाठी रांगाच रांगा लावत आहेत.
दरम्यान केंद्र सरकारच्या नवीन मोटार वाहन कायद्याबाबत ट्रकचालकांमध्ये नाराजी पाहायला मिळत आहे.  याचे पडसाद हरियाणा, पंजाब या राज्यासोबतच महाराष्ट्रात पडत असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.
नवी मुंबईत संपाला हिंसक वळण
नवी मुंबई येथे  हिंसक आंदोलन करत 15 ते 20 टँकर चालकांनी धुमाकूळ घातला होता. अखेर एनआरआय पोलिसांनी हिंसक आंदोलन करणार्‍यांना ताब्यात घेतले. यानंतर परिसरात कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला. पोलिसांच्या हस्तक्षेपानंतर परिस्थिती नियंत्रणात आली. नाशिकमधील टँकर चालकांनी संप पुकारला असून हे लोण राज्यातील इतर जिल्ह्यातही पसरण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
 
 
गॅस सिलेंडरच्या दरात कपात
नवी दिल्ली : नवीन वर्षाच्या पहिल्या दिवशीच इंधनाच्या दरांबरोबरच गॅस सिलेंडरचे दरही कमी झाले आहेत. 19 किलोग्राम वजनाच्या कमर्शिअल एलपीजी गॅस सिलेंडरचे दर कमी केले आहेत. एका अर्थाने उद्योग, व्यापारामध्ये असलेल्या सिडेंलर वापरकर्त्यांना नवीन वर्षाचे गिफ्ट देताना पहिल्याच दिवशी कंपन्यांनी प्रति सिलेंडर 1.50 रुपये दरकपात केली आहे.दरम्यान घरगुती एलपीजी सिलेंडरच्या दरांमध्ये कोणतेही बदल करण्यात आले नसल्याने गॅस सिलेंडरचे दर कमी करूनही
सर्वसामान्यांना फायदा नाही .
डॉक्टर महिलेची आत्महत्या
चंदीगड: हरियाणातील पंचकुलामध्ये एका 35 वर्षीय महिला डॉक्टरने 11 व्या मजल्यावरून उडी घेत आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. पूनम अग्रवाल असे मृत महिला डॉक्टरचे नाव आहे. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळ गाठून मृतदेह ताब्यात घेऊन पोस्टमार्टमसाठी पाठवला. या प्रकरणाचा तपास सुरू असल्याचं पोलिसांचं म्हणणं आहे. घटनास्थळावरून अद्याप कोणतीही सुसाइड नोट सापडलेली नाही.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button