
पुणे : पोर्शे अपघाताच्या घटनेनंतर पुण्यातील बेकायदा पब आणि बार रेस्टॉरंटचा मुद्दा समोर आला होता. राज्य सरकार व पोलीस प्रशासनाने याची दखल घेत कारवाईही सुरू केली. मात्र, त्यानंतर काही दिवसांताच पुण्यातील एका हॉटेलमध्ये तरुणाई ड्रग्ज (Drugs) घेतल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला. या घटनेने पुन्हा एकदा पुण्यातील ड्रग्जच्या रॅकेटचा मुद्दा समोर आला होता. आता, पुन्हा एकदा कात्रज परिसरात 106 ग्रॅम मेफड्रोन सापडल्याने पुणे शहराला आणि येथील तरुणाईला झालंय काय, असा प्रश्न उपस्थित होत आहे. दरम्यान, पोलिसांनी (Police) या ड्रग्जसह दोन तरुणांना अटक केली आहे.
कात्रज परिसरात मेफेड्रोन (एमडी) विक्री करण्यासाठी दोन तरुण आल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार, सापळा रचून ड्रग्जची विक्री करणाऱ्या राजस्थानमधील दोन तरुणांना गुन्हे शाखेच्या अमली पदार्थ विरोधी पथकाने अटक केली. आरोपीच्या ताब्यातून 21 लाख 38 हजार रुपयांचे 106 ग्रॅम मेफेड्रोनसह व दुचाकी असा 22 लाख 58 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. श्रवणसिंग बलवंतसिंग राजपूत (वय 22, मूळ रा. नयानगर, जि. बाडमेर, राजस्थान) आणि महेश पुनाराम बिश्नोई (वय 20, मूळ रा. कुशलावा, जि. जोधपूर, राजस्थान) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. हे दोघे सध्या खराडी परिसरातील तुळजाभवानीनगरमध्ये राहतात. या दोघा आरोपींविरुद्ध भारती विद्यापीठ पोलिस ठाण्यात एनडीपीएस ॲक्टनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


