महाराष्ट्र

ध्येयनिश्चितता

   स्वामी विवेकानंदांच्या वैचारिकतेतला “विश्वगुरू भारत”,डॉ.ए.पी.जे.अब्दुल कलाम यांच्या वैचारिकतेतला “महासत्ताक भारत” या दोन संकल्पना मला अगदीच विचारात पाडतात.दोघांच्याही जीवन जडणघडणीत भगवद्गीतेचे विशाल योगदान. मुळात गीतेचा उगमच झाला तो धर्म संस्थापनेचं उदात्त कार्य हाती घेऊनच.मला बऱ्याचदा प्रश्न पडतो की,महाभारतासारखं प्रचंड युद्ध या भारत भूमीतच का घडलं?अथवा काहींच्या मते हे काव्य असेल तर ते या भूमीतच का लिहिलं गेलं? विश्वाच्या पाठीवर इतर संस्कृतींमध्ये, भूभागांमध्ये ते का नाही घडलं? तर विचारांती मला लक्षात येते की,या भारतभूमीचे मूळ तत्त्वच आहे की धर्मावर आधारित समाजाची निर्मिती करणे. अखिल मानव जातीला याच धर्मासाठी प्रेरित करणारा महान विचार हा गीतेमध्ये दिसून येतो. भारतासारख्या देशाने कधीच एकछत्री राज्य विचारातच घेतले नाही.इथे विविध सत्तांच्या शासन संस्था होत्या.पण सर्व व्यवस्थांना जोडणारे एक सूत्र होते ते म्हणजे ‘धर्म’.श्रीकृष्णांनी धर्मस्थापना केली असे आपण नेहमी वाचतो,ऐकतो.पण म्हणजे नेमके काय केले?तर मथुरेतून मूळ कार्यारंभ करत त्यांनी भक्कम पाया उभारला.मथुरेमध्ये कंसाबद्दल जन-माणसांमध्ये आक्रोश होता. मस्तावलेल्या हत्तीला मारणे, कुब्जेचा दोष दूर करणे,धनुर्भंग करणे,चाणुरमर्दन करणे आणि यातून कंसाच्या मनात भीती निर्माण केली व भर सभेत सिंहासनावरून खाली ओढून त्याचा वध केला. या कृत्याला कोणीही विरोध केला नाही.ना सैन्य ना व्यवस्था.यानंतर श्रीकृष्ण स्वतः राजा झाले असते तर कोणीही विरोध केला नसता. पण त्यांनी कंसाच्या दुष्कृत्याची पुनरावृत्ती केली नाही.कंसाचे वडील उग्रसेन यांना कारावासातून बाहेर काढत राज्य सोपविले.ज्या व्यक्तीला यादव श्रेष्ठींनी राजा म्हणून स्वीकारले होते त्यालाच त्यांनी पुन्हा राजा बनविले,आणि यालाच ‘धर्मसंस्थापन’ असे म्हणतात. श्रीकृष्णाकडे एक व्यक्तीविशेष म्हणून पाहताना वाटते की,जेव्हा एखादे महान कार्य करायचे असते तेव्हा त्याचा आधार हा त्यागातच असतो.आपण स्वतःसाठी जितके गोळा करत जाऊ तितकी आपली परिणामकारकता कमी होत जाईल आणि बहुधा श्रीकृष्ण हे व्यक्तिमत्व या गुणवैशिष्ट्यामुळेच लोकप्रिय ठरले.
           माणसाचे ध्येय निश्चित असेल तर त्याला नेमकी कोणती कृती कोणत्या वेळी करायची आहे हे निश्चित कळते. महाभारतामधील प्रत्येकी एक पात्र जरी आपण पाहिले तर त्यांचे प्रत्येकाचे स्वतःचे असे विशेष ध्येय होते.सत्ता,संपत्ती, राज्य,अधिकार ही ध्येयं एका बाजूला दिसतात आणि धर्माची स्थापना हे ध्येय एका बाजूला. सर्व हितकारक ध्येय निश्चित करून त्यासाठी शक्य तो प्रत्येक प्रयत्न करणे हेच श्रीकृष्णांच्या जीवनपटातून आपल्याला जाणवते.आणि म्हणूनच की काय आपण सर्व त्यांना ‘पूर्णपुरुष’ म्हणून ओळखतो. महाभारत-रामायणातल्या गोष्टी ऐकून ज्यांची धर्मावरची निष्ठा अटळ झाली व अधर्माचा विनाश करण्यासाठी ज्यांची भवानी तलवार होऊन बाहेर पडली त्या छत्रपती शिवाजी महाराजांनी शाहिस्तेखानाची बोटे कापली, अफजलखानाचा वध केला पण कधी याचे समारंभ केले नाहीत. उलट या बातम्या आदिलशहापर्यंत पोहोचण्याआधीच आणखी दहा-बारा किल्ले ते जिंकायचे आणि हा क्रम नेहमी चालायचा. विजयाच्या सोहळ्यापेक्षा विजयाची बळकटी ही नेहमी महाराजांना महत्त्वाची वाटायची. माणसाचं देखील त्याच्या जीवनात असंच होतं.स्वप्न बघून ते पूर्ण करता-करता ध्येयाचा हात विजयाच्या उन्मादात सहज निसटून जातो.मला अमुक ठिकाणी जायचे आहे,इतके कमवायचे आहे,असे घर बांधायचे आहे,ही सगळी स्वप्नं झाली. आणि माझ्या राष्ट्राच्या हितासाठी कोणते पाऊल गरजेचे आहे,माझ्या राष्ट्रातल्या संपन्न जीवनशैलीसाठी काय गरजेचे आहे किंवा माझ्या कोणत्या कृतीने सर्वसमावेशकतेचा संदेश माझ्या जीवनातून देता येईल ही ध्येयं झाली.उत्तम ध्येय हे नेहमी समस्त मानवजातीसाठी एक उदात्त उदाहरण असते.या विचारासहित भेटूया पुढील सदरात.
॥गीतार्पणमस्तु॥
                 -निकिता पाटील
                    आंधळगाव.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button