
पैठण, (शिवाजी गाडे)ः पैठण येथील श्री संत एकनाथ महाराज नाथ षष्ठी सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर पालकमंत्री संदिपान भुमरे यांनी आढावा बैठक घेतली.बुधवार दिनांक 6 मार्च रोजी बाहेरील नाथ मंदिरात सर्व शासकीय विभागाचे विभाग प्रमुख भाविक भक्त वारकरी व पैठणकर यांच्या उपस्थितीत मंत्री संदिपान भुमरे यांनी नाथ षष्ठी बाबत आढावा घेऊन सविस्तर सूचना केल्या.शौचालयाची व्यवस्था, रस्त्यांची स्वच्छता, पाणीपुरवठा, वारकरी फडात लाईटची व्यवस्था, महाराष्ट्रात जाण्या येण्यासाठी बसेसची व्यवस्था, आरोग्य सुविधा, वारकर्यांसाठी पोलीस बंदोबस्त अनुचित प्रकार घडू नये म्हणून पोलीस पॉईंट, सह अनेक विषयावर यावेळी चर्चा करण्यात आली.सदरील नाथ षष्ठी सोहळा हा 425 वा असल्याने नाथ मंदिर जायकवाडी धरणावर विशेष रंगीबिरंगी लाईट व्यवस्था करावी अशा सूचना यावेळी पालकमंत्री संदिपान भुमरे यांनी संबंधित विभागाला दिल्या.
या वर्षीच्या नाथषष्ठीत येणार्या भाविक भाविक भक्तांना वेगळा आनंद मिळाला पाहिजे अशी सुविधा वारकर्यांना पुरवावी अशा सूचना जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी दिल्या.श्री संत एकनाथ महाराज नाथ षष्ठी सोहळा 31 मार्च रोजी सुरू होणार असून 1 एप्रिल रोजी छबीना मिरवणूक व 2 एप्रिल रोजी दहिहंडी काला होणार आहे.
या बैठकीसाठी जिल्हाधिकारी दिलीप स्वामी, जिल्हा पोलीस अधीक्षक मनीष कलवानिया, उपजिल्हाधिकारी निलम बाफना, उपविभागीय पोलीस अधिकारी डॉक्टर सिद्धेश्वर भोरे ,तहसीलदार सारंग चव्हाण ,गटविकास अधिकारी संजय कुलकर्णी ,पैठण नगरपरिषद मुख्याधिकारी संतोष आगळे ,राज्य दूध संघाचे नंदू अण्णा काळे, बस स्थानक प्रमुख गजानन मडके, नामदेव खरात, माजी नगराध्यक्ष सोमनाथ परदेशी ,तुषार पाटील, गणेश मडके ,अरुण काळे, अमोल जाधव सह सर्व माजी नगरसेवक उपस्थित होते.



