
वैजापूर,प्रतिनिधीःतालुक्यातील नमूर येथे वधुपक्षाला तब्बल पावणेदोन लाख रुपये देऊन धूमधडक्यात बुधवारी दि.10 रोजी लग्न विधी उरकला.या लग्नानंतर दुसर्याच दिवशी नववधू अंगावरील दागिन्यांसह पसार होताच मोठी खळबळ उडाली.या प्रकरणी शिऊर पोलीस ठाण्यात नववधूसह तिच्या पाच साथीदारांविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मुला-मुलींच्या जन्मदरात मोठी तफावत आल्याने अनेक उपवर मुलांचे लग्न जुळणे थांबले आहेत. त्यातच शेतकरी नवरा नको गं बाई म्हणत शेतकर्यांच्या मुलांना नवरी मिळणे कठीण झाले आहे. याचा फायदा घेऊन शेतकर्यांच्या मुलांना फसवणूक त्यांच्याकडून पैसा हडपणारी टोळी पुन्हा सक्रिय झाली आहे.तालुक्यातील मनूर येथील अंबादास विश्वनाथ दवंगे (29) या युवकाचे लग्न नंदिनी राजू गायकवाड, (राजीव गांधीनगर अकोट फईल, जि. अकोला) या युवतीशी 10 एप्रिल रोजी दुपारी 2 वाजता झाले या लग्नासाठी मुलीकडील मंडळींनी नवरदेवाकडून एक लाख 81 हजार रुपये घेतले. त्यानंतर विधीवत लग्न सोहळा संपन्न झाला. सायंकाळी लग्न सोहळा आटोपल्यानंतर सर्व जण झोपी गेले. परंतु रात्री दोन वाजता नववधू दागिन्यासह फरार झाली. आपण फसलो गेल्याचे नवरदेवाच्या लक्षात आल्यानंतर त्याने थेट पोलीस ठाणे गाठून आपली फिर्याद दिली. दवंगे परिवाराला गंडा घालून ही नववधू दागिन्यांसह फरार झाली आहे. तिच्या सोबतचे सहकारी देखील फरार झाले आहे.आरोपीचा शोध पोलीस घेत आहे.परिसरातून या टोळीविरुद्ध रोष व्यक्त केला जात आहे. भोळ्याभाबड्या शेतकरी कुटुंबांना या टोळ्या लग्नाचे आमिष दाखवून लग्न जमवतो. असे सांगून लग्न लावून त्यानंतर नवरी फरार होते,अशा घटनांमुळे संताप व्यक्त केला जात आहे.या प्रकरणी अंबादास दवंगे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून नवरी नंदिनी राजू गायकवाड, अनिल दिगंबर जोशी (रा.जवळी खुर्द, ता. कन्नड), मनीषा गजानन मानवते (रा. खामगाव, जि. बुलढाणा), पूजा विजय माने (रा. महाडीक वाडी, लिंगीवरे, जि. सांगली), रंजीत (पूर्ण नाव माहीत नाही) (रा. हिंगोली) या पाच जणांविरुद्ध शिऊर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस करीत आहे.



