मराठवाड़ा

‘महावितरण’चे रमेश शिंदे उद्या आकाशवाणीवर

छत्रपती संभाजीनगर : राज्य शासनातर्फे गुणवंत कामगार पुरस्कार प्राप्त महावितरणचे कर्मचारी रमेश काकासाहेब शिंदे यांची गुरुवारी (१६ मे) सायंकाळी ६.३५ वाजता आकाशवाणीच्या छत्रपती संभाजीनगर केंद्रावर मुलाखत प्रसारित होणार आहे. 

     कामगार सभा या कार्यक्रमात स्मिता नामदे यांनी घेतलेली ही मुलाखत आकाशवाणीच्या सर्व केंद्रावरून तसेच ‘न्यूज ऑन एआयआर’ या ॲपवरही प्रसारित केली जाणार आहे. शिंदे यांना काही महिन्यांपूर्वीच महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळातर्फे विश्वकर्मा गुणवंत कामगार पुरस्कार महाराष्ट्राचे राज्यपाल रमेश बैस यांच्या हस्ते प्रदान करण्यात आलेला आहे. महावितरणमध्ये २०११ पासून काम करणारे ‍शिंदे सध्या हिवरा ३३ केव्ही उपकेंद्रात यंत्रचालक म्हणून कार्यरत आहेत. महावितरणमधील उत्कृष्ट तांत्रिक कामांसोबतच सामाजिक, सांस्कृतिक क्षेत्रातही त्यांचे उल्लेखनीय योगदान आहे. ते छत्रपती संभाजीनगर तालुक्यातील वाहेगाव देमणी येथील रहिवासी आहेत. महाविद्यालयीन स्तरावर आपल्या अभिनय कौशल्याने विविध युवक महोत्सव, राष्ट्रीय आंतरविद्यापीठ स्पर्धा गाजवणाऱ्या शिंदेंनी महावितरणसह कामगार नाट्य स्पर्धा व राज्य नाट्य स्पर्धांतही विविध पारितोषिके पटकावलेली आहेत. उत्कृष्ट व्याख्याता, निवेदक, सूत्रसंचालक असलेल्या शिंदेंचे ‘उद्योगाचा कणा : कामगार आणि वास्तव’ हे पुस्तक प्रकाशित झालेले असून. कवितासंग्रह प्रकाशनाच्या वाटेवर आहे. कामगार चळवळीतही ते सक्रिय आहेत.
     शिंदे यांना गतवर्षी मिरज येथे झालेल्या कामगार साहित्य संमेलनात कामगार कल्याण मंडळातर्फे वैचारिक लेखन व काव्य लेखनासाठी राज्यस्तरीय साहित्य पुरस्कार प्रदान करण्यात आलेला आहे. तसेच महावितरणच्या ‍ परिमंडल कार्यालयातर्फे त्यांना सहव्यवस्थापकीय संचालकांच्या हस्ते विशेष गुणगौरव पुरस्काराने सन्‍मानित करण्यात आले. महावितरणतर्फेच त्यांना उत्कृष्ट तांत्रिक कामगार पुरस्कारही मिळालेला आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button